सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत गेल्या पाच वर्षात सुमारे 45 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये बहुतांश पुढार्यांच्या संस्थांनाच मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आला आहे. व्यायाम शाळा विकास अनुदान, क्रीडांगण विकास अनुदान, तसेच नाविन्यपूर्ण योजनेतून कामे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत केली जातात. गेल्या पाच वर्षात सुमारे 25 कोटी रुपये व्यायाम शाळा विकास अनुदान वितरित करण्यात आले आहे. तर क्रीडांगण विकास अनुदान सुमारे साडेसोळा कोटी रुपये वाटण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून विविध संस्थांना कबड्डी मॅट देणे, कुस्ती मॅट तसेच क्रीडा साहित्य देण्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था, आदिवासी आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा, तालुका क्रीडांगण तसेच जिल्हा क्रीडांगण उभारण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव येतात आणि डीपीडीसी मधून याला मंजुरी दिली जाते. सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये सध्या तालुका क्रीडा संकुल बांधण्याची कामे सुरू आहेत. तालुका क्रीडा संकुल बांधण्यासाठी आता पाच कोटी रुपयांचे तर जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यासाठी तब्बल 25 कोटी रुपयांचे अनुदान दिले जात आहे.









