रुग्ण सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
येस न्यूज नेटवर्क: रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमरावती येथील शासकीय महिला रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. मात्र, दोन महिन्यांनंतरही राज्यातील १३४ शासकीय रुग्णालयांकडे अग्निसुरक्षेचे अनिवार्य ना-हरकत प्रमाणपत्र (Fire NOC) नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील ५२७ शासकीय आरोग्य संस्थांपैकी ५११ ठिकाणी फायर ऑडिट पूर्ण झाले आहे. मात्र, केवळ ३९३ रुग्णालयांनी फायर NOC प्राप्त केले आहे. तर ५९ आरोग्य संस्थांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा अद्याप बसविणे बाकी आहे.
विशेष म्हणजे, फायर ऑडिट पूर्ण होणे आणि प्रत्यक्ष अग्निसुरक्षा व्यवस्था कार्यान्वित असणे यामध्ये मोठी तफावत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ५६६ रुग्णालयांना आदेश
सोलापूर जिल्ह्यातही अग्निसुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील शासकीय आरोग्य संस्थांसह एकूण ५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांचाही समावेश आहे.
फक्त ऑडिट नको, प्रत्यक्ष सुरक्षितता हवी!
रुग्णालयांमध्ये फायर अलार्म, स्प्रिंकलर, अग्निशमन उपकरणे, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, विद्युत यंत्रणेची तपासणी आणि ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे.
विशेषतः ICU, NICU आणि ऑपरेशन थिएटरसारख्या विभागांमध्ये आग लागल्यास रुग्णांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
रुग्णालय प्रशासनाने केवळ कागदोपत्री फायर ऑडिट न करता प्रत्यक्ष अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा दुर्घटना रोखण्यासाठीच प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.











