येस न्युज मराठी नेटवर्क । राजधानी दिल्लीत असलेल्या इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी रात्री बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली होती. या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीतून या हल्ल्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संकेत मिळत आहे. पोलिसांनी परिसरातील तीन सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. त्याचबरोबर सापडलेल्या चिठ्ठीत हा तर फक्त ट्रेलर आहे, असा इशारा देण्यात आल्याचं समोर आलं आहे.
इस्रायली दूतावासाजवळ कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून, परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कॅब दिसून आली आहे. या कॅबने दोन लोकांना घटनास्थळी सोडलं होतं. त्यानंतर कॅब निघून गेल्याचं दिसत आहे.
कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, तिथे पायी जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. सीसीटीव्ही ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून, दोन्ही व्यक्तींची स्केच तयार केली जात आहे. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांना बरंच साहित्य मिळालं असून, यात एक लिफाफा सापडला. लिफाफ्यात एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे.’ असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे.