अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सुरक्षेच्या कारणानं राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या एलिमिनेटरच्या लढतीपूर्वीचं सरावाचं सत्र रद्द केलं आहे. याशिवाय आरसीबीनं पत्रकार परिषद देखील सुरक्षेच्या मुद्यावरुन रद्द केली आहे. आरसीबीचा सराव मंगळवारी गुजरात कॉलेज ग्राऊंडवर होणार होता. मात्र, आरसीबीनं कोणतंही अधिकृत कारण न सांगता सराव सत्र रद्द केलं होतं. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं सराव सत्रात सहभाग घेतला. विराट कोहलीसह इतर खेळाडूंच्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यानं आरसीबीनं या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद देखील रद्द केली.
गुजरात पोलिसांच्या अधिकाऱ्यांचा दाखला देत बंगाली भाषेतील दैनिक आनंदबझार पत्रिका या वृत्तपत्रानं आरसीबीनं सराव सत्र रद्द करण्याचा आणि दोन्ही संघांनी पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यामागील कारण सुरक्षेचं कारण असल्याचा दावा करण्यात आला आहे. विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याच्या कारणावरुन पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
आरसीबीकडून सरावसत्रासह पत्रकार परिषद रद्द
गुजरात पोलिसांनी अहमदाबादच्या विमानतळावर सोमवारी रात्री चार जणांना दहशतवादी कारवायांच्या संशयावरुन अटक करण्यात आली होती. पोलिसांना त्यांच्याकडून शस्त्र, काही व्हिडीओ आणि टेक्स्ट मेसेज मिळाले होते. यासंदर्भातील माहिती दोन्ही संघांना देण्यात आली होती. राजस्थान रॉयल्सनं सराव सत्रात भाग घेतला. दुसरीकडे आरसीबीनं सराव सत्र आणि पत्रकार परिषद रद्द केली. हे करताना कोणतंही कारण अधिकृतपणे सांगण्यात आलं नव्हतं. राजस्थान आणि बंगळुरुचा संघ सोमवारीचं अहमदाबादमध्ये पोहोचला होता.











