बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीमागचे शुल्ककाष्ठ दूर होण्यासाठी नगरसेवकाने प्रभू वैद्यनाथ यांच्या चरणी दंडवत घातलं आहे. परळी नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी सपत्नीक प्रभू वैद्यनाथ चरणी दंडवत घातलं.
धनंजय मुंडे सध्या मोठ्या संकटात आहेत. त्यांच्यावरील संकट दूर व्हावे, म्हणून परळी येथील नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी तब्बल दोन किलोमीटर अंतर कापत प्रभू वैद्यनाथाला दंडवत घालत प्रार्थना केली. ढोल ताशांच्या गजरात हे दंडवत घालण्यात आले.
धनंजय मुंडेंवर शुक्लकाष्ठ
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर त्यांच्यात नात्यातील रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी देखील हे प्रकरण उचलून धरत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तब्बल पाच दिवस हे प्रकरण राज्यभरात गाजले. मुंडे सध्या मुंबईतच आहेत. त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत, असा दावा मुंडे समर्थकांनी केला आहे.