कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापुरातील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी काल सुमारे तीन ते चार लाखांवर भाविकांनी तुळजापुरात दर्शन घेतले. आज भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. शुक्रवार पासून आंध्र, कर्नाटक,तेलंगणा, या राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणावर पायी चालत तुळजापूरकडे गेले. त्यामुळे काल प्रचंड मोठी गर्दी झाली होती. यासाठी सोलापूर तुळजापूर हा महामार्ग बंद ठेवण्यात आला होता.
आज एसटीद्वारे मोठ्या प्रमाणावर भाविक परतू लागल्यामुळे सोलापूरच्या एसटी स्टँडवर देखील प्रचंड मोठ्या रांगा लागल्या होत्या. आज पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे हे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आज देखील तुळजापुरात दाखल झाले आहेत. तर आज रात्री तुळजाभवानी मंदिरात सोलापूरच्या शिवलाल तेली समाजाच्या काठीचे आगमन होणार असून काठ्यांसह रात्री मंदिरात छबिना काढला जाणार आहे. एकूणच तुळजापुरात आई राजा उदो उदो जयघोष आणि जिकडे पहावे तिकडे भाविकच भाविकच पाहायला मिळतात.






