डायमिथाइल कार्बोनेटच्या स्वदेशी उत्पादनाची दखल; देशाच्या रासायनिक उद्योगातील आत्मनिर्भरतेला बळ
मुंबई : बालाजी अमाईन्स लिमिटेडला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) तर्फे प्रदान करण्यात येणारा FICCI केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स पुरस्कार २०२६ ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’ या श्रेणीत प्रदान करण्यात आला. स्वदेशी रासायनिक उत्पादनांच्या विकासासाठी आणि शाश्वत औद्योगिक उपाययोजनांसाठी कंपनीने दिलेल्या योगदानाची या पुरस्काराद्वारे दखल घेण्यात आली.
१९२७ मध्ये स्थापन झालेली फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) ही भारतातील प्रमुख औद्योगिक व व्यावसायिक संघटनांपैकी एक आहे. औद्योगिक विकास, व्यापारवृद्धी आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यात या संघटनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. FICCI तर्फे प्रदान करण्यात येणारे केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स पुरस्कार रासायनिक व पेट्रोकेमिकल क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि योगदानाची दखल घेऊन प्रदान केले जातात.
\
मुंबई येथील आयटीसी मराठा हॉटेलमध्ये २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारत सरकारच्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालयाचे, सचिव श्री तेजवीर सिंग यांच्या हस्ते बालाजी अमाईन्स लिमिटेडचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी श्री. विनोद चुंगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी डॉ. जी. व्यंकटेश सहसचिव (पेट्रोकेमिकल्स), रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभाग व श्री दीपांकर आरोन सहसचिव (रसायने) रसायन आणि पेट्रोकेमिकल विभाग, रसायन आणि खते मंत्रालय उपस्थित होते याच श्रेणीत एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेड या कंपनीलाही पुरस्काराने गौरविण्यात आले.
बालाजी अमाईन्स लिमिटेडने भारतात डायमिथाइल कार्बोनेट (DMC) या महत्त्वपूर्ण रसायनाचे उत्पादन सुरू करण्याच्या उपक्रमाची या पुरस्काराद्वारे विशेष दखल घेण्यात आली आहे. लिथियम-आयन बॅटरीसह विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये या रसायनाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. देशांतर्गत उत्पादनामुळे या रसायनासाठी आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन संधी निर्माण होणार आहेत.
बालाजी अमाईन्स लिमिटेडचे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांत चार अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प असून, कंपनी आपल्या उत्पादनांची निर्यात जगातील ५० हून अधिक देशांमध्ये करते. कंपनीचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून मान्यताप्राप्त स्वतंत्र संशोधन व विकास (R&D) केंद्र आहे. या केंद्रामार्फत विशेष रासायनिक उत्पादनांचा विकास, उत्पादन प्रक्रियेत सुधारणा आणि तंत्रज्ञानविषयक संशोधनावर भर दिला जातो.
कंपनीने रासायनिक उद्योगातील योगदानासाठी केंद्र व राज्य सरकारांसह विविध संस्थांकडून अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त केले आहेत. या यशाबद्दल बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, हा पुरस्कार कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची तसेच व्यवस्थापन आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक योगदानाची पोचपावती आहे. प्रत्येक यशाबरोबर अधिक चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी वाढते, असे नमूद करून त्यांनी स्वदेशी उत्पादन, संशोधन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून भारताला रसायने व विशेष रसायनांच्या क्षेत्रात अधिक सक्षम बनविण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.








