शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या प्रयत्नाला यश
सोलापूर : माढा तालुक्यातील तुळशी गावात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी गेलेल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी श्रीफळ आणि पुष्पहार देऊन स्वागत केले. शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील समन्वयातून मोजणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत तुळशी ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका घेतली. या उपक्रमातून गावाने महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेत सकारात्मक सहभागाचे उदाहरण इतरांसमोर ठेवले आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणी प्रक्रियेदरम्यान प्रशासन आणि स्थानिक शेतकरी यांच्यात समन्वय राहणे महत्त्वाचे आहे. तुळशी गावातील शेतकऱ्यांनी मोजणीच्या वेळी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य केले. यामुळे स्थानिक पातळीवर संवाद, समन्वय आणि सहभागातून शासकीय कामकाज पुढे नेण्याचा सकारात्मक संदेश मिळाला आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली माढा उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार माढा यांच्याकडून या प्रक्रियेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनाची भूमिका आणि प्रशासनाचे समन्वयाचे प्रयत्न यांना स्थानिक पातळीवर नागरिकांचा सहभाग लाभल्यास शासकीय कामकाज अधिक सुलभ होऊ शकते. तुळशी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी मोजणी प्रक्रियेत दाखविलेला सहभाग याच दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे.
तुळशी गावात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीच्या वेळी गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केले. यावेळी टेंभुर्णीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरणे, माढा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विजय कवडे, मंडळ अधिकारी वागज, तलाठी बनसोडे, तलाठी खंदारे मॅडम आणि कृषी अधिकारी देवडकर यांची उपस्थिती होती. शेतकरी मारुती खाडे, प्रमोद वसेकर यांच्यासह गावातील अन्य शेतकरी व ग्रामस्थांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला.
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीदरम्यान तुळशी ग्रामस्थांनी दाखविलेल्या सहकार्यामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. गावातील शेतकऱ्यांचा हा सक्रिय सहभाग इतर गावांसाठीही सकारात्मक उदाहरण ठरू शकतो.
"आज आमच्या तुळशी गावात शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची मोजणी सुरू झाली असून यात भूमिहीन होणारे आमचे शेतकरी मारुती खाडे यांनी स्वतःच या मोजणीची पूजा केली आहे. आमच्या गावाने शासनाच्या या उपक्रमात सहकार्याची भूमिका घेतली असून शासनाने सीना-माढा योजनेचे पाणी तुळशीकरांना उपलब्ध करून द्यावे, त्यामुळे उर्वरित शेत जमिनीला सिंचनाचा लाभ होईल तसेच भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना इतर ठिकाणी जमीन उपलब्ध करून द्यावी." शेतकरी प्रमोद वसेकर









