सोलापूरच्या उजनी धरणात गेल्यावर्षी आजच्या तारखेला 117 टीएमसी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा होता. यंदाच्या वर्षी आज सकाळच्या आकडेवारीनुसार हा पाणीसाठा 109 टीएमसी असून जिवंत पाणी साठ्याची पातळी 85 टक्के एवढ्या खाली आली आहे. यंदाच्या वर्षी 50 टक्के देखील पाऊस न झाल्यामुळे 1972 पेक्षा देखील भयानक अवस्था पाण्याची होईल असे सध्याचे चित्र असताना काही ठराविक तालुक्यांसाठी आणि ठराविक आमदारांच्या इच्छेसाठी उजनी धरणातून बेसुमार पाण्याचा उपसा सुरूच आहे. उजनी धरणातून सध्या डाव्या कालव्याद्वारे 2350 क्युसेक पाणी सुरू आहे. 15 जुलैपासून हे पाणी सुरूच आहे. सीना माढा लिफ्ट इरिगेशन साठी 210 तर दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 110 आणि बोगद्यातून 600 क्युसेक पाणी सोडले जात आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बाष्पीभवन देखील सुरू झाली आहे. त्यामुळे हे पाणी राखीव ठेवणे खूप गरजेचे आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी नियोजनाची समिती देखील निर्माण करण्यात आली आहे. मात्र त्या समितीची बैठक अद्याप निश्चित झाली नाही. सध्या कॅनॉल मधून पाठवण्यात येणाऱ्या पाण्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदाच नाही. त्यामुळे हे पाणी बंद करण्याची मागणी होत आहे.








