सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या हुतात्मा स्मृती मंदिर येथे आज महापौर विनायक कोंड्याल यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. हुतात्मा स्मृती मंदिरात विविध सांस्कृतिक, सामाजिक व शासकीय कार्यक्रम होत असल्याने येथे नागरिकांना तसेच कार्यक्रम आयोजकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापौरांनी पाहणी केली.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेवक बिजू प्रधाने,सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर, नगर अभियंता नीलकंठ मतपती, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, प्रशांत बडवे, शिवकुमार धनशेट्टी, दादा साळुंखे, आशुतोष नाडकर आदी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान स्टेज, स्टेजखालील हॉल, मेकअप रूम, कार्यालय, स्वच्छतागृहे, खुर्च्या, पडदे, साऊंड सिस्टिम तसेच विद्युत सुविधांची पाहणी करण्यात आली. ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी तातडीने आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
स्टेजवरील संपूर्ण आवश्यक कामे पूर्ण करण्याबरोबरच स्टेजखालील हॉलची दुरुस्ती, मेकअप रूम व स्वच्छतागृहांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. दुरावस्थेत असलेल्या खुर्च्या बदलून नवीन खुर्च्या उपलब्ध करून देण्याबाबतही महापौरांनी सूचना केल्या. तसेच कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेली साऊंड सिस्टिम व्यवस्थित उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
हुतात्मा स्मृती मंदिरात विविध कार्यक्रम नियमितपणे होत असल्याने कार्यक्रमांच्या व्यवस्थेसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात येईल, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी यावेळी सांगितले.
पाहणीदरम्यान वापरात नसलेले अथवा स्क्रॅप झालेले साहित्य संबंधित ठिकाणाहून हटवून महानगरपालिकेच्या स्टोअरमध्ये जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
हुतात्मा स्मृती मंदिर अधिक स्वच्छ, सुस्थितीत व सुविधायुक्त करण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या कामांसाठी लागेल तेवढा आवश्यक निधी महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच आवश्यक मनुष्यबळ आणि साऊंड सिस्टिमची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.
















