सोलापूर : विद्यार्थ्यांच्या जीवनात निरोगी आहार आणि योग्य आहार-विहाराच्या सवयी रुजविणे आवश्यक असून, विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. राघवेंद्र नादरगी यांनी केले.राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त निमा सोलापूर अंगीकृत आयुर्वेद फोरम यांच्या वतीने विश्वकृपा विद्या प्रतिष्ठान, बाळे यांच्या सहकार्याने डी. व्ही. डेपे प्रशाला, बाळे येथे विद्यार्थ्यांसाठी ‘आहाराचे शास्त्रोक्त महत्त्व व आहार-विहार’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .


यावेळी डॉ. नादरगी यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार, योग्य वेळेवर भोजन, पौष्टिक पदार्थांचे महत्त्व तसेच दैनंदिन दिनचर्येत आहार-विहाराचे पालन याबाबत आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या टाळण्यासाठी लहान वयापासूनच आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. फास्ट फूड, जंक फूड, बेकरी पदार्थ याऐवजी आयुर्वेदीय पौष्टिक पण स्वादिष्ट पदार्थांचा वात पित्त कफ यांच्या प्रकृतीचा अभ्यास करून आहारात समावेश करावा जेणेकरून आजारापासून चार हात लांब राहता येईल असे प्रतिपादन यावेळी केले.
सदर कार्यक्रमास निमा सेंट्रलचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभूर्णीकर, निमा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जीड्डीमनी, खजिनदार डॉ. प्रवीण ननवरे, आयुर्वेद फोरमचे अध्यक्ष डॉ. महेशकुमार बिलुरे, निमा वुमन फोरमच्या डॉ. अश्विनी देगावकर, निमा स्टुडंट फोरमचे अध्यक्ष समर्थ वाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक अमोल ढेपे यांनी स्वीकारले तर सूत्रसंचालन सुजाता ढेपे यांनी केले.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आयुर्वेदातील आहार-विहाराचे महत्त्व समजावून देत निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.











