सोलापूर- महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालये आणि सार्वजनिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले. धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.
दिंडी मार्ग तसेच पालखी मुक्काम स्थळांवर आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरांमधून एकूण ९ हजार ८४४ वारकरी व भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जगदाळेमामा हॉस्पिटल, नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल (बार्शी), विठ्ठल हॉस्पिटल, जनकल्याण हॉस्पिटल (पंढरपूर), युगांधर हॉस्पिटल, यशोधरा हॉस्पिटल, गांधीनाथ हॉस्पिटल, धनराजगिरजी आयुर्वेदिक हॉस्पिटल, शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय (बाळे), पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत हॉस्पिटल (केगाव), शेठ सखाराम आयुर्वेदिक हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल (कुंभारी), अल फैज जनरल हॉस्पिटल यांच्यासह विविध धर्मादाय रुग्णालयांचा सहभाग होता.
बार्शी, मोहोळ, मोडनिंब, अकलूज, वेळापूर, पंढरपूर, सोलापूर, मंगळवेढा, बंडीशेगाव, वाखरी, फलटण आदी दिंडी मार्गांवर तसेच पालखी मुक्काम स्थळांवर ही आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीबरोबरच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन आणि प्राथमिक उपचारांची सुविधाही देण्यात आली.
“वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून धर्मादाय रुग्णालये व सार्वजनिक संस्थांनी वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा, अन्न, पाणी तसेच निवासाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल धर्मादाय उप आयुक्त श्री. ईश्वर सूर्यवंशी यांनी सर्व धर्मादाय रुग्णालये, सार्वजनिक संस्था आणि त्यांच्या व्यवस्थापनाचे विशेष अभिनंदन केले.
तसेच धर्मादाय उप आयुक्तांनी प्रसार माध्यमांचेही विशेष आभार मानले. त्यांच्या आवाहनाचा व्यापक प्रसार झाल्यामुळे अनेक धर्मादाय संस्था या अभियानात सहभागी झाल्या आणि दिंडी मार्गावर तसेच पालखी मुक्काम स्थळांवर वारकऱ्यांसाठी निवास, अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली.
आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य तपासणी अभियानाच्या यशस्वी नियोजनासाठी कार्यालयीन निरीक्षक उमेश देशमुख यांचे नियोजन तसेच धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर यांनी कळविले.











