करमाळा : करमाळा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत २ लाख ५६ हजार २०० रुपये किमतीचा गांजा आणि ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास करमाळा पोलिस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. करमाळा तालुक्यातील सांगोबा प्लॉटिंग परिसरात एक व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
त्यानुसार पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध पथक व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून संशयित मोटारसायकलस्वाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तीकडे असलेल्या पोत्यामध्ये सुमारे १० किलो २४८ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत २,५६,२०० रुपये इतकी असून, वापरात असलेली ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल देखील पोलिसांनी जप्त केली.अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव दिलीप उर्फ फंट्या रोही दोशी (रा. गुजार गल्ली, करमाळा, जि. सोलापूर) असे असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेसाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील इतर दुव्यांचा शोध घेतला जात आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात करमाळा पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, परिसरात खळबळ उडाली आहे.










