सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मतदारांनी छप्पर फाडके भाजपवर निवडणुकीत प्रेम केल्याने महापालिकेत 87 तर झेडपी मध्ये 38 भाजप सदस्य निवडून आले. त्यामुळे उदंड झाले नेते अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. याचा प्रत्यय झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आला.झेडपीचे नूतन अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा सत्कार करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दोन डझन पदाधिकारी झेडपी सभागृहातील स्टेजवर आले होते. पालकमंत्री आल्यानंतर आपल्याला जागाच मिळणार नाही असं म्हणत माजी आमदार राजन पाटील आणि दीपक साळुंखे यांनी अगोदरच खुर्च्यावर ताबा मिळवला. माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपच्या झेडपीतील गटनेत्या रश्मी बागल हे देखील खुर्च्यांवर पुढे बसल्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना तसेच नूतन उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांना खुर्ची शिल्लक नव्हती. शेवटी एकमेकांनी ॲडजस्ट करत दुसऱ्या खुर्च्या मागून आमदार सचिन दादा तसेच इंदाभाऊंना खुर्च्या दिल्या. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापती रंजीता चाकोते, यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि पदाधिकारी उभे होते. शेवटी काही जणांनी अतिरिक्त खुर्च्या मागवून काही पदाधिकाऱ्यांची सोय केली. यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचे कौतुक करताना राजन पाटील, प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे, राम सातपुते, या माजी आमदारांसह आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार राजा राऊत यांनी देवा भाऊ आणि जया भाऊ यांचे भरभरून कौतुक केले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कौतुक करण्याची जणू झेडपी सभागृहात स्पर्धाच लागली होती असे चित्र होते.

