सरवदे नगरात विरभद्र वेषात मिरवणुकीने महाशिवरात्री साजरी
सोलापूर : प्रत्येक पूरवंताच्या शरीरावर १० ते १२ रुद्राक्ष माळा, अंगरखा, फेटा, हार यासह कमरेला पितळी कमरपट्टा, दंडाला बाजूबंद, शस्त्र आणि तलवार असा सुमारे २० किलो वजनी साज चढवून आज सरवदे नगरातील पूर्ववंतांनी प्रत्यक्ष रुद्रावतार साकारला. महाशिवरात्रीनिमित्त सोलापुरातील मुळेगाव रोडवरील सरवदे नगरात श्री मल्लिकार्जुन चॅरिटेबल ट्रस्ट आणि साक्षी गणपती तरुण मंडळाच्या वतीने ही वीरभद्र वेषातील भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. हैदराबाद रोडवरील श्री मल्लिकार्जुन मंदिरात पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने सोलापूरकरांचे डोळे दीपवले.
शिवाची भक्ती माणसाला परम समाधान देते, ती स्वतःला समजून घेण्यास मदत करते आणि हीच भक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवाशी एकरूप होण्याची संधी देते. याच श्रद्धेतून ही परंपरा दरवर्षी हणमंत सराटे यांच्याकडून जपली जात आहे. लिंगायत किंवा वीरशैव यांची प्रमुख देवता शिव असून वीरभद्र हे भगवान शिवाचे अत्यंत उग्र आणि बहाद्दूर अवतार मानले जातात. सतीच्या मृत्यूनंतर शिवाच्या क्रोधाग्नीतून निर्माण झालेल्या वीरभद्राने दक्ष राजाचा यज्ञ उधळून लावला होता. ते शक्ती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रतीक असल्याने, त्यांच्याकडून शिवपूजन करण्याची प्रथा मागील अनेक वर्षांपासून सरवदे नगरात पारंपरिक वेषात सुरू आहे.
ऐतिहासिक साज: २० किलो वजन
या मिरवणुकीत पूर्ववंतांचा पेहराव आकर्षणाचे केंद्र होता. रुद्राक्ष माळांपासून ते तलवारीपर्यंत सर्व अलंकारांचे वजन सुमारे २० किलो होते. या जड वेशभूषेतही पूर्ववंतांनी मोठ्या उत्साहात विधी पार पाडले.लिंगायत धर्मातील ‘गुगुळ’ ही सांस्कृतिक प्रथा कुलाचार म्हणून पाळली जाते.
पुरवंत सेवेकरी
आजच्या या महापूजेत मुख्य अर्चक तथा पूर्ववंत हनुमंत सराटे यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर भागेळी, शिवकुमार रेखे, अनिकेत पाटील, इरणा भागेळी आणि हिराणा मुनोळी यांनी पूर्ववंत सेवा दिली, तर मल्लिकार्जुन भागेळी यांनी संबळ वादन केले.
महाप्रसाद वाटप
सोहळ्यानंतर ५०० भक्तांना शाबुदाणा खिचडी आणि भगर महाप्रसाद वाटप करून उत्सवाची सांगता करण्यात आली.


