सोलापूर – सोलापुरातील वाळू माफियांना रोखण्यासाठी गौण खनिज विभाग सतर्क झाले असून वर्षभरात बेकायदा वाहतूक करणाऱ्या 410 घटना घडल्या आहेत. या प्रकरणी 132 वाहने जप्त करण्यात आली असून 61 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि तब्बल 27 जणांना गजाआड करण्यात आले आहे.
ही कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी आता वाहन परवानाच रद्द करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.गौण खनिजांच्या चोरीमुळे शासनाच्या महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी झाली असून या अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारी क्षेत्र वाढत आहे.
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या कारवाईत वाहन चालकांना एकूण आठ कोटी 23 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून त्यापैकी तीन कोटी 21 लाख रुपये वसूल झाले आहेत. जिल्ह्यात बेकायदा मुरूम उपसा व वाहतुकीच्या 263, मातीच्या 13 आणि दगडाच्या 21 घटना रोखण्यात आले आहेत.
माढ्यात बेकायदा वाळू उपसाच्या 10 तर वाहतुकीच्या नऊ घटना रोखण्यात आल्या आहेत.
सोलापुरातील मुरूम चोरीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
