सोलापूर, दमाणी नगर येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान शिल्पकार, सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते आणि समता, बंधुता व न्याय यांचे पुरस्कर्ते भारतरत्न डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन अर्पण केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या महान कार्याची, त्यांच्या समाजक्रांतीची आणि उपेक्षित, वंचित घटकांना उभारी देणाऱ्या योगदानाची आठवण करून दिली. डॉ. आंबेडकरांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र आणि मानवतेचा संदेश आजही समाजाला प्रेरणा देत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आयडल्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुणाल बाबरे, भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिलिंद प्रक्षाले , रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष संतोष सपकाळ, शाळेचे सचिव व दलित मित्र सुनील दावडा, मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे, आरती गांधी, बळीराम पावडे, आनंद पारेकर, संध्या चंदनशिवे, रेणुका पासपुले, योगिता बोधले, विजया पिटाळकर, विठ्ठल सातपुते, ठाकर, बसाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या या शाळेत दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा जागर विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
शाळेचे सचिव दलितमित्र सुनील दावडा यांनी संस्थेच्या वतीने बोलताना सांगितले की, “डॉ. आंबेडकरांचे जीवनकार्य हे सदैव प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांवर चालत सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्न करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.” मुख्याध्यापिका सौ. गाताडे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांचा संघर्षमय प्रवास, संविधान निर्मितीतील त्यांचे नेतृत्व आणि मानवतावादी दृष्टीकोन याबाबत मार्गदर्शन केले.

