सोलापूर – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात “रेलवन” या अँप च्या संदर्भात मुख्य स्थानकांवर पोस्टर आणि प्रात्यक्षिके दाखवून प्रवाश्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने रेलवन हे अँप काही महिन्यांपूर्वी डेव्हलप करून रेल्वेच्या सेवा पूर्ततेसाठी वापरात आणण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर रेल्वे विभागातील सोलापूर, पंढरपूर, कलबुर्गी, लातूर, कुर्डुवाडी या मुख्य स्थानकांवर या अँप च्या संदर्भात माहिती सांगण्यात येत आहे. तिकीट बुकिंग आणि आरक्षण या दोन्ही काउंटरवर या संदर्भात विस्तृत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.


या अँप मधून आरक्षित तिकीट बुकिंग, आर-वॉलेट वापरून ३% सवलतीसह अनारक्षित यूटीएस तिकिटे, लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग आणि रिअल-टाइम चौकशी, ई-केटरिंगद्वारे फुड ऑर्डर, तक्रार निवारण प्रणाली, प्लॅटफॉर्म तिकिटे, तिकीट रद्द करणे, पीएनआर सेवा आदी सेवांचा फायदा रेल्वे प्रवासी घेऊ शकतात.
सोलापूर विभागातून रेल्वेचा प्रवास करणारे आणि इतर सर्व रेल्वे उपभोक्त्यांनी रेल्वेच्या सेवांचा उपभोग घेण्यासाठी रेलवन सारख्या अँप डाउनलोड करून एकाच छताखाली असलेल्या सर्व प्रवासी सेवांचा पुरेपूर वापर करावा असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक श्री योगेश पाटील यांनी केले आहे. प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून रेलवन डाउनलोड करू शकता. शिवाय विद्यमान रेलकनेक्ट/यूटीएस क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा किंवा नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा.


रेलवन या अँप ची सोलापूर रेल्वे विभागाच्या डीआरएम सोलापूर या अधिकृत ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, थ्रेड आणि यु ट्यूब या सोशल मीडिया हँडल वरून संपूर्ण माहिती देण्यात येत आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी सोलापूर रेल्वे विभाग सदैव कटिबद्ध आहे.

