माढा – पूरग्रस्त भागात आज सकाळपासूनच बाधित भागांची पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढ्याचे आ.अभिजित पाटील यांनी पाहणी करून नागरिकांना धिर दिला.या वेळी सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस व अतिवृष्टी होत आहे. तसेच उजनी धरणातून भीमा नदीत तसेच सीना कोळेगाव प्रकल्पातून सीना नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला जात असल्याने माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर या तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत.
प्रशासनाच्या वतीने या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून अकरा बोटी पुरेशा मनुष्यबळासह उपलब्ध करून घेतल्या असून त्या घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्याला अधिक गती मिळाली आहे. त्याप्रमाणेच माढा तालुक्यातील दारफळ येथे पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून एनडीआरएफ टीमचे पथक बचावासाठी गेले होते परंतु पुराच्या पाण्याचा प्रवाह खूप गतीने येत असल्याने त्यांना त्या नागरिकांना सुखरूप ठिकाणी बाहेर काढणे शक्य झालेले नव्हते त्यामुळे सैन्य दलाची चर्चा करून त्या नागरिकांना एअरलिफ्टद्वारे सुखरूप ठिकाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लवकरच आर्मीचे हेलिकॉप्टर पथक दारफळ येथे पोहोचून सर्व नागरिकांना बाहेर काढण्याची कार्यवाही करतील.
महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून एनडीआरएफचे आणखी एक पथक बचाव कार्यासाठी मिळवले असून ते माढा येथील बचाव कार्यात सहभाग घेणार आहेत. संपूर्ण सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणा ही महापूराची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. तरी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 0217/2731012 या क्रमांक वर संपर्क साधून अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील गावांमध्ये शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे, पुलांचे नुकसान झाले आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत दिली जाईल अ.शी ग्वाही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना दिली.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतपिकांचे, घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.












