सोलापूर दि. ६ (जिमाका) सोलापूर जिल्ह्यातील श्री. क्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या माघवारी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने पंढरपूर शहरातील सर्व देशी, सर्व विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या व ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणेसंदर्भात 8 फेब्रुवारी 2025 रोजी एकादशी दिवशी मद्य विक्री मनाई आदेश जारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
माघवारी यात्रा उत्सव – 2025 निमित्त पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी एकादशी दिवशी पंढरपूर शहरातील सर्व एफएल-2 एफएल-3, एफएल-4, एफएलडब्ल्यू-2, नमुना ई-2, एफएलबीआर-2 मद्य विक्री व ताडी अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
तरी पंढरपूर शहरातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्तीधारक व ताडी विक्री अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.