सोलापूर-भारतीय समाज व्यवस्थेतील बलुतेदार पध्दतीमधील लोहार, सुतार, कुंभार चांभार यासारख्या मूळ कारागिरांच्या स्वरूपाचे विस्मरण होता कामा नये. परंपरागत कारागिरीला नव्याने उजाळा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाच्या शिल्पकला विभागातील प्रा. मधुकर वंजारी यांनी केले.
सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्यावतीने हुतात्मा स्मृती मंदिर पार्किंग येथे सोलापुरातील कलावंतांच्या भरवण्यात आलेल्या चित्र व शिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, प्रसिध्द चित्रकार भगवान चव्हाण (चेन्नई), उद्योगपती दत्ता सुरवसे, एमआयटी डिझाईन महाविद्यालयाचे अतुल केडिया, वैष्णवी डिवरे, डॉ. उमा प्रधान, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे सचिव प्रा. डॉ.नरेंद्र काटीकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रा. वंजारी म्हणाले, शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या बुध्यांकाकडे लक्ष दिले जाते. परंतु मानवी जीवनातील महत्त्वाचा पैलू असलेल्या भावनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. परंपरागत कारागिरीला नव्या पध्दतीने उजाळा देणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
मा धर्मराज काडादी यांनी, सोलापुरातील कलाकारांना नेहमी प्रोत्साहन देण्याची भूमिका राहील अशी भूमिका मांडली. याप्रसंगी चव्हाण यांनी चित्र व शिल्प प्रदर्शनाबद्दल गौरवोद्गार काढून आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले चित्र या प्रदर्शनात भरवण्यात आल्याचे सांगितले.
उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे यांनी सोलापुरातील कलावंत उच्च पातळीवर कला निर्माण करत आहेत आणि सोलापूरातील कलावंतानी याला व्यावसायिक स्वरूप कसे मिळेल हे पहावे प्रदर्शन पाहून त्यांनी या बद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रदर्शनात २७ स्टॉलअसून २५ व २६ जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी प्रदर्शन खुले राहणार आहे. तसेच चित्र व शिल्प खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरच्या वतीने कवी संमेलन पार पडले. चित्रशिल्पप्रदर्शनाबरोबर काव्य या साहित्य कलाप्रकाराचा सुगंध दरवळला यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ वीस कवींनी या कवी संमेलनामध्ये सहभाग घेतला.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केले.प्रमुख अतिथींचा परिचय व स्वागत सचिव डॉ.नरेंद्र काटीकर यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव प्रा. नरेंद्र काटीकर यांच्यासह रामचंद्र हक्के , नितीन जाधव देवेंद्र निंबर्गीकर, सचिन गायकवाड, प्रवीण रणदिवे,आदी उपस्थित होते. आभार अंजली स्वामी यांनी तर सूत्रसंचालन अभिंजली जाधव यांनी केले .