पंढरपूर : आज कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांच्यासोबत यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला. घुगे दांपत्य गेल्या 15 वर्षांपासून वारी करत आहेत.
महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं आहे, तसेच, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी, असं साकडं देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाच्या चरणी घातलेलं आहे.
बऱ्याच विरोधानंतर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून चारवेळा आषाढीला आणि उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कार्तिकीला संधी मिळाली आहे. आज पहाटे फडणवीस यांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. तर, एकदा विरोध झाल्याने फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानीच मध्यरात्री महापूजा केली होती. शिवाय आता उपमुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने, फडणवीस यांच्या हस्ते सातव्यांदा महापूजा झाली आहे.