मुंबई : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसापूर्वीच अविश्वास प्रस्ताव आणला आहे, त्यामुळे सदस्यांना अपात्र ठरवण्याचा त्यांना अधिकार नसल्याचं पत्र दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा सचिवांना पाठवलं आहे. महेश बालदी आणि विनोद अग्रवाल असं या दोन आमदारांची नावं असून ते भाजप गटातील असल्याचं समजतंय.
दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर आता दोन अपक्षांनी हे पत्र लिहिलं असून त्यांनी या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा संदर्भ दिला आहे. एखाद्या विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांविरोधात जर अविश्वास प्रस्ताव आणला गेला असेल तर त्यांना सदस्यांच्या अपात्रतेविरोधात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही असं या पत्रात नमूद केलं आहे. त्या आधी अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना हा प्रस्ताव मंजूर करुण घ्यावा लागतो आणि त्या नंतरच त्यांना सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार असतो असं या पत्रात म्हटलं आहे.