येस न्युज नेटवर्क : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या गैरवापरावरून आज सत्ताधाऱ्यांचं संसदेत लक्ष वेधलं. फेसबुकची सत्ताधाऱ्यांशी असलेलं साटेलोटं जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी धोका असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. फेसबुकने सत्तेशी साटेलोटं केलं आहे. त्यामुळे सामाजिक सौहार्द भंग पावत आहे. आपल्या लोकशाहीसाठी हा मोठा धोका आहे. फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल माध्यमांचा काही राजकीय नेते आणि राजकीय पक्षांद्वारे पॉलिटिकल नरेटिव्ह तयार केला जात आहे. हा वैश्विक सोशल मीडिया सर्व राजकीय पक्षांना समान संधी देत नसल्याचं वारंवार दिसून आलं आहे, असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत मीडियाचं स्वातंत्र्य आणि सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीवर आलेल्या संकटाकडे संसदेचं लक्ष वेधलं. भारतीय जनसमूहाला प्रभावित करण्यासाठी एक उद्योग समूह पुढे आल्याचा एक न्यूज रिपोर्टही आला होता. त्यातच आज सोनिया गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा लावून धरला. सोनिया गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेते निशिकांत दुबे यांनी पलटवार केला आहे.
