येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर रात्री निर्मनुष्य रस्त्यावर मजूर, गरीब नागरिकांना पिस्तूल व गुप्तीचा धाक दाखवून अश्लील व अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडणारी चांडाळचौकडी जोडभावी पेठ पोलिसांनी ताब्यात घेतली. चारही तरुण तिशीच्या आतले आहेत.
सागर अरुण कांबळे (वय २२, रा. न्यू बुधवार पेठ), बुद्धभूषण नागसेन नागटिळक (वय २६, रा. बुधवार पेठ), सतीश उर्फ बाबूला अर्जुन गायकवाड (वय २५, रा. मिलिंदनगर, बुधवार पेठ), अक्षय प्रकाश थोरात (वय २६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर, बुधवार पेठ) अशी अटक झालेल्या चौघांची नावे आहेत.
हे चारही मित्र जुना तुळजापूर नाका, पुणे रोड, कारंबा, मार्डी रस्त्यावर रात्री दहानंतर परतणाऱ्या कामगार, मजूर, गरीब नागरिकांना अडवत आणि पिस्तूल व गुप्तीचा धाक दाखवत. त्यांना अनैसर्गिक दुष्कर्म, विकृत प्रकार करण्यास भाग पाडत. तो मोबाइलवर रेकॉर्डिंग करून मित्रांमध्ये व्हायरल करत होते.
चार संशयितांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. चौघे बेरोजगार आहेत. विकृत आनंदासाठी हा प्रकार करत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सागर कांबळे मुख्य संशयित अाहे. आणखी काहींचा सहभाग असून त्यांचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
४ फेब्रुवारी रोजी ही बाब समोर आली. फौजदार केतन मांजरे व त्यांच्या पथकाने कारवाई केली. यात सहायक आयुक्त संतोष गायकवाड, निरीक्षक बाळासाहेब भालचीम, विजयालक्ष्मी कुर्री, फौजदार मांजरे, हवालदार आबा थोरात, सुरेश जमादार, अतुल गवळी, खाजप्पा आरेनवरु, थिटे, राजेश घोडके, स्वप्निल कसगावडे, गोपाळ शेळके, दत्ता काटे, बाळू माने, बेळ्ळे, नागटिळक, सुहास गायकवाड या पोलिसांचा समावेश होता.
पिस्तूल कुठून आणला याचा शोध
टोळीकडून पिस्तूल, एक गोळी, गुप्ती, चार मोबाइल, दोन दुचाकी जप्त आहेत. आरोपी अक्षय थोरातवर यापूर्वीच जबरी चोरी, विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यांनी पिस्तूल कोठून आणले याचा तपास सुरू आहे.