मुंबई : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या खडसे यांच्या चौकशीची चर्चा सुरू असतानाच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे.
भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने न्या. झोटिंग समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला गोपनीय अहवालही सरकारकडे सुपूर्द केला होता. मात्र, हा अहवाला मंत्रालयातून गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अहवालाची मागणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.अहवाल गहाळ झाल्याच्या प्रकरणावरून भाजपाने सरकारवर टीका केली आहे. अहवाल गहाळ होण्यामागे सरकारच असल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.









