सोलापूर । कडक संचारबंदीतही नागरिकांना आता सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत भाजीपाला, किराणा माल खरेदी करता येणार आहे. मात्र, या वेळेत कोरोनासंबधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकाकडील वाहन जप्त केले जाणार आहे. त्या वाहनाची सुटका 1 जूननंतरच केली जाणार आहे, तसे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांनी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना दिले आहेत. संचारबंदीच्या काळात दुचाकीवरून डबल- ट्रीपल सिट प्रवास करण्यावर निर्बंध आहेत. तर तीन- चारचाकी वाहनात एकूण क्षमतेच्या 50 टक्केच प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियम पाळणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकाला दंड करून त्याच्याकडील वाहन जप्त केले जाणार आहे. दुचाकीवर दोघांनी प्रवास केल्यास पाचशे तर तिघांनी प्रवास केल्यास साडेसातशे रूपयांचा दंड आकारला जात आहे.

