मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरलीय. कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “त्यांच्या निधानाने काँग्रेस पक्षाचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालंय. राजकारणातला देवमाणूस गेला”, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सातव यांना आदरांजली वाहिली. राजीव यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना वडेट्टीवार यांना गहिवरुन आलं. ते बोलता बोलता रडायला लागले.
“राजीव सातव तरुण तडफदार होते. अभ्यासू नेते होते. कोणत्याही विषयांवर बोलू शकतील, असं त्यांच्याकडे ज्ञान होतं. जिद्दीने आणि चिकाटीने काम करणं त्यांच्या रक्तात होतं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी आपली छाप दिल्लीत सोडली होती. व्यक्ती म्हणून ते हळवे होते. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या भावना ते समजून घेऊन त्याच्यावर योग्य मार्ग काढत. आम्हाला नेहमी राजीव यांचं मार्गदर्शन लाभायचं. दिल्लीत गेल्यानंतर एक हक्काचा माणूस की ज्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या भावना सांगाव्यात आणि त्यांनी ते प्रश्न सोडवावेत, असा नेता आम्ही गमावला”, असं सांगत असताना वडेट्टीवार यांना अश्रू अनावर झाले.
