येस न्युज मराठी नेटवर्क : आधी लॉकडाऊन, मग चक्रीवादळ, नंतर अवकाळी पाऊस आणि आता पुन्हा एकदा युकेसह इतर देशात सुरु झालेले लॉकडाऊन. यामुळे गुलाब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. व्हॅलेंटाईन डे तरी आपल्याला नफा मिळवून देईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांवर कोरोनाने संक्रांत आणली आहे. लॉकडाऊनपासून 20 कोटींचा तर आता व्हॅलेंटाईन डेला तब्बल तीस कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.यंदा परदेशात अद्याप कोरोना थैमान घालतोय, परिणामी गुलाबाच्या मागणीत चाळीस टक्क्यांनी घट झाली आहे. शिवाय फुलांच्या दरात कपातही झाली आहे.
अशीच काहीशी परिस्थिती प्रत्येक गुलाब उत्पादक शेकऱ्यांची आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाचाही फटका सहन करावा लागतो आहे. या आंदोलनामुळं अपेक्षित बाजारपेठेत गुलाब पोहचू शकत नाहीये. तो इतर बाजारात कवडीमोल किंमतीत द्यावा लागतोय. 2020 या वर्षात एकामागेएक अशा अनेक संकटांनी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचे अक्षरक्षः कंबरडेच मोडले आहे. ज्या परदेशी बाजारपेठेवर हा शेतकरी अवलंबून होता. तिथं पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल्याने हा शेतकरी मेटाकुटीला आला आहे.