येस न्युज मराठी नेटवर्क । गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाची जबाबदारी पेलणारे अभिनेते सयाजी शिंदे कायमच झाडांच्या संवर्धनासाठी आणि वृक्षारोपण करण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे त्यांनी हाती घेतलेलं हे काम आता लोकचळवळ होऊ लागल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या शिवजयंतीनिमित्ताने सयाजी शिंदे यांनी एक नवीन मोहिम हाती घेतली आहे.
सयाजी शिंदे यांच्या फॅनपेजवर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी यंदा शिवजयंतीला प्रत्येक गडावर ४०० झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर हिरवी मशाल दिसली पाहिजे, असं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे. इतकंच नाही तर शिवजयंतीनिमित्त ते स्वत: पन्हाळगडावर जाऊन वृक्षारोपन करणार आहेत.