उद्या संचालकांची मिटिंग अबब…आजवर झाला एवढा खर्च
सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून शिल्लक राहिलेले 72 कोटी रुपये सोलापूर महापालिकेकडे नोव्हेंबर महिन्यात वर्ग करण्यात आले आहेत. उद्या या कंपनीची 47 वी मीटिंग सकाळी 11 वाजता होणार आहे. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे हे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे चेअरमन आहेत. 2016 साली सोलापुरात स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी स्थापन करण्यात आली.गेल्या दहा वर्षात या कंपनीच्या माध्यमातून केंद्र राज्य आणि महापालिकेच्या निधीतून 47 विविध प्रोजेक्ट करण्यात आले.असून त्यावर 1567 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातील बहुतांश कामे निकृष्ट आणि गरज नसणारी असून ती महापालिकेला मेंटेन करणे देखील अवघड झाले आहे . 18 कोटी रुपये खर्च करून विकसित केलेले पार्क स्टेडियम, एलईडी प्लाझा, शहरात दहा किलोमीटर लांबीचे 125 कोटी रुपये खर्चून केलेले सिमेंटचे रस्ते, 23 कोटी रुपये खर्चून केलेला महापालिका हरीभाई देवकरण प्रशाली समोरचा रस्ता ही काही उदाहरणे आहेत. यातील सगळ्यात मोठा खर्च उजनी ते सोलापूर जलवाहिनीवर 882 कोटी रुपये झाला आहे. आता ही कंपनी मार्च महिन्यातच बंद करा असे आदेश केंद्र सरकारने दिले असताना देखील जानेवारी 2026 ते सप्टेंबर 2026 या नऊ महिन्याच्या पगार,कार्यालयीन, ऑडिट , बोर्ड मीटिंग या खर्चासाठी तब्बल 75 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ऑक्टोबर 26 ते मार्च 27 या सहा महिन्यासाठी 71 लाख रुपयांची तरतूद ठेवावी असा प्रस्ताव स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या उद्या होणाऱ्या मीटिंग समोर ठेवण्यात आला आहे. कंपनी बंद करा असे केंद्र सरकारचे पत्र असताना देखील अजून स्मार्ट सिटी च्या नावाखाली वर्षाकाठी कोटभर रुपयाची उधळपट्टी सुरूच आहे.







