महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. या निवडणूक निकालावर विरोधकांकडून शंकाही उपस्थित केल्या गेल्या. विधानसभा निवडणुकीत गडबड असल्याचे आरोप केले जात आहेत. निकालाच्या दोन दिवसानंतरही मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेलं नसताना कर्जत जामखेडमध्ये शरद पवार गटाच्या रोहित पवारांकडून पराभूत झालेले भाजप नेते राम शिंदे यांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. राम शिंदे आरोप करताना अजित पवार यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचं म्हटलंय. माझ्याविरोधात नियोजीत कट रचला गेला आणि त्याचा मी बळी ठरलो अशा भावना राम शिंदे यांनी व्यक्त केल्या.
कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांनी १२४३ मतांनी निसटता विजय मिळवला. या मतदारसंघात अजित पवार यांनी रोहित पवार यांच्याविरोधात सभा घेतली नव्हती. कराडमध्ये प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी रोहित पवारांची भेट झाली तेव्हा मी सभा घेतली नाही म्हणून वाचलास असं मिश्किल विधानही अजित पवार यांनी घेतलं. आता याच विधानाचा दाखला देत भाजप नेते राम शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत.
महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भात पक्षाकडे आणि अजित दादांकडे मागणी करत होतो. आता अजितदादांनी स्वत: सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं. याचा अर्थ हा नियोजित कट होता. त्यात माझा बळी गेला. दुसरं म्हणजे आमदार रोहित पवार स्वतला भावी मंत्री मुख्यमंत्री समजतात. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत स्वताचा कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही. त्याचाही प्रत्यय आला.
राजकीय सारीपाटात जे झालं त्याचा मी बळी ठरलो. मी अगोदरच सांगितलंय, जाहीरपणे बोलण्याची माझी इच्छा नव्हती. पण दादाच जर बोलले तर मला बोलण्याशिवाय पर्याय नाही. कौटुंबिक कलहाच्या दरम्यान जे अघोषित करार झाले त्यांची अंमलबजावणी कर्जत जामखेडमध्ये दिसली. त्यांच्या पक्षाचा अजेंडा असेल, पण महायुतीचा धर्म पाळणं अपेक्षित आहे असंही राम शिंदे यांनी म्हटलं.
राज्यात सर्वात कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझा नंबर लागतो. मी या कटाचा आणि अघोषित कारवाईचा बळी ठरलो हे सिद्ध झालंय. वरिष्ठांकडे तक्रार करण्यासंदर्भात, तर महायुतीसाठी हे चांगलं नाही.यावर वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाई केली पाहिजे ही अपेक्षा राम शिंदे यांनी व्यक्त केली.