श्री प्रतापगडाचा रणसंग्राम हा जगातील अद्वितीय पराक्रम
सोलापूर : छत्रपती श्री शिवरायांनी क्रूरकर्मा अफजलखानाला त्याच्या कृत्यांची शिक्षा देऊन संपवले. श्री प्रतापगडाचा रणसंग्राम हा जगातील लढायांपैकी अद्वितीय पराक्रम आहे, असे प्रतिपादन छत्रपती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी केले.
३५० व्या श्री शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी मार्गदर्शन केले. ‘शिवप्रताप ‘ या विषयावर बोलताना त्यांनी कान्होजी जेधे, प्रतापगड युद्धनीती, जावळीचा वेढा आणि अफझलखान वध आदींवर विवेचन केले.
प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी म्हणाले, आदिलशाहीच्या आदेशानुसार विजापूरवरून निघाल्यानंतर अफजल खानाने पंढरपूर, तुळजापूर येथील मंदिरांची तोडफोड करून त्यांची नासधूस केली. कान्होजी जेधे यांनाही अफजलखानाने पत्र पाठवून बोलावले. परंतु कान्होजी जेधे हिंदवी स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्यासारख्या असंख्य एकनिष्ठ सहकाऱ्यांमुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याचे राज्य स्थापन केले. अफजल खान वधानंतर छत्रपती श्री शिवरायांची कीर्ती भारतभरात पसरली आणि त्यांच्या नावाची जरब बसली, असेही प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी सांगितले.
याप्रसंगी सिनेकलावंत आमीर तडवळकर यांच्या समर्पित नाट्यशाळेच्या कलाकारांनी ‘अफजल खान वध’ हा चित्तथरारक प्रसंग नाट्यरूपातून उत्तमरित्या सादर केला. यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बालकलाकारांचे कौतुक केले.
सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी प्रास्ताविक तर गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
आज ‘ शिवधैर्य ‘ या विषयावर मार्गदर्शन अन् प्रसंग सादरीकरण