स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

0
23

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, प्रत्येक नागरिकांच्या घरांवर तिरंगा ध्वज लावण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात 9 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्त 9 ऑगस्टला जिल्हास्तरावर आणि तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभाची उभारणी, सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छता, महत्वाचे वारसा स्थळांची देखभाल करून ऐतिहासिक वारसा जपणूक करणे, महाविद्यालये कलापथक आणि पथनाट्य यांचे कार्यक्रम सर्व मंडळाच्या ठिकाणी होणार आहेत. जिल्हा, तालुका मुख्यालय, प्रमुख गावांच्या रस्त्यांच्या कडेला अनाम वीर, हुतात्मे यांच्या कार्याची माहिती लावण्यात येणार आहे. शिवाय जिल्हा, तालुक्याच्या स्वातंत्र्यकालीन, ऐतिहासिक माहितीचे डिजीटल फ्लेक्स तयार करून लावण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढण्याचे नियोजन असून नागरिकांनी यामध्येही सहभागी व्हावे. पुरातत्वदृष्ट्या महत्वाच्या वारसा स्थळांची स्वच्छता, प्रत्येक शासकीय कार्यालयांची स्वच्छता करण्यात येणार आहे. 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान विद्यापीठस्तरावर कार्यशाळा, चर्चासत्रे, जाणीव जागृतीबाबत विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 12 ऑगस्टला सायक्लोथॉन, 14 ऑगस्टला मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी शाळा, महाविद्यालयात अनुक्रमे निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ऑगस्टला सर्व शासकीय कार्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात येणार असून 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी एनसीसी, एनएसएस पथकांसोबत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. त्यादिवशी तिरंगी रंगाचे बलून आकाशात सोडण्यात येणार असल्याची माहिती शंभरकर यांनी दिली.