येस न्युज मराठी नेटवर्क : कृषी कायद्यांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना चुकीची माहिती दिली गेली आहे अशी खोचक टिप्पणी करणारे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. चूक काय आणि बरोबर काय यावर प्रदीर्घ काळ चर्चा होऊ शकते पण सत्य समोर यायला हवं. ते समोर आणणं हे कृषीमंत्र्यांचं काम आहे,असं आव्हानच शरद पवार यांनी दिलं आहे. ‘केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविषयी शरद पवारांपर्यंत चुकीची माहिती गेली होती. त्यामुळं त्यांचा गैरसमज झाला होता. आता त्यांना योग्य माहिती दिली गेली आहे. ते आपली भूमिका बदलतील आणि कायद्यांचे समर्थन करतील, असा खोचक टोला तोमर यांनी हाणला होता. त्याला शरद पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून अत्यंत सविस्तर उत्तर दिलं आहे.