मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती खालावल्यामुळे मंगळवार, दि. १० सप्टेंबर रोजी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारादरम्यानच ७२ वर्षीय येचुरी यांचे निधन झाले. २०१५ साली ज्येष्ठ दिवंगत नेते प्रकाश करात यांच्यानंतर सीताराम येचुरी यांची पहिल्यांदाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०१८ आणि २०२२ साली त्यांना दोन वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली. डाव्या पक्षातील निर्णय प्रक्रियेत सरचिटणीस हे सर्वोच्च पद मानले जाते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते सरचिटणीस या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. डाव्या विचारसरणीशी असलेली एकनिष्ठता, त्या अनुषंगाने घेतलेल्या भूमिका आणि त्या भूमिकांसाठी वेळोवेळी राजकीय किंमत मोजण्याची तयारी.. या गुणांमुळे ते भारतीय डाव्या राजकारणातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून समोर आले.