मुंबई : विविध सरकारी योजनांचा आधार घेत गेली अनेक वर्षे तोट्यात असलेली एसटी आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे. ‘गाव तेथे एसटी’ असं ब्रीद कायम ठेवताना आर्थिक अडचणींना देखील एसटी महामंडळाला सामोरे जावे लागत होते. मात्र एसटी महामंडळ ऑगस्ट महिन्यात 16 कोटी 86 लाख 61 हजारांनी फायद्यात ले आहे. जुलै महिन्यात एसटी महामंडळाला 18 कोटींचा तोटा झाला होता. ऑगस्ट महिन्यात कोणतेही मोठे सणवार नसूनही एसटी महामंडळानं तोटा कमी करत 16 कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे.
दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती. मे 2022 पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापि, एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने 75 वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50 टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. या आधी 2015 साली एसटी महामंडळ फायद्यात आलं होतं.