चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे येथे घेतला. यावेळी खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

चाकण परिसरातील विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कामाचा रोडमॅप तयार केला असून समितीला आवश्यक त्या सूचना व मागण्या ऐकून घेऊन काम करण्यास पूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकाच व्यासपीठावर आल्या असून, ही सकारात्मक बाब आहे. समितीच्या माध्यमातून विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.











