विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रिसिजनने दिला “वाचनाचा पासवर्ड” – दिलीप स्वामी

0
123

सोलापूर- शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विचार करण्याची सवय लागावी यासाठी प्रिसिजनने हाती घेतलेला उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. प्रिसिजन आणि युनिक फीचर्स यांच्या माध्यमातून “पासवर्ड वाचन अभियान” या उपक्रमाचे उद्घाटन आज ५ ऑगस्ट रोजी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. युनिक फिचर्स पुणे यांच्या सहकार्याने या उपक्रमाची सुरुवात मागील एक वर्षापासून करण्यात आली आहे.सोलापूर जिल्ह्यातील आठ शाळा व एक हजार विद्यार्थ्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

दिलीप स्वामी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आम्ही शिक्षकांसाठी एक दशसूत्री कार्यक्रम दिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, तंत्रज्ञान, मूल्यांची रुजवात व्हावी असे कार्यक्रम त्यात आहेत. त्याला अत्यंत पूरक असा उपक्रम प्रिसिजनने हाती घेतला. त्याबद्दल प्रिसिजनचे अभिनंदन केले पाहिजे, असेही स्वामी म्हणाले. प्रिसिजनने जिल्ह्यातील अनेक शाळांसाठी चांगले उपक्रम राबवले आहेत. पासवर्ड या अभियानाच्या माध्यमातून मोठे कार्य केले आहे, असे दिलीप स्वामी यांनी आपल्या मनोगतात आपले विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर पासवर्ड अभियानाचे प्रमुख आनंद अवधाने यांनी पासवर्ड अभियानाचा मागील वर्षभराचा आढावा घेत या अभियानाची उपयुक्तता सांगितली.

या पासवर्ड अभियानात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सोनामाता प्रशाला, कमला नेहरू प्रशाला, जिल्हा परिषद शाळा बेलाटी, जिल्हा परिषद शाळा अंबिका नगर बाळे, अरण येथील संत सावता माळी प्रशाला, मोहोळ शाळा नंबर 4, जिल्हा परिषद शाळा अरण, जिल्हा परिषद शाळा पापरी ता.मोहोळ या आठ शाळांमधील एक हजार विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले आहेत. यावर्षीच्या या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा, सर फाऊंडेशनचे सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, अनघा जागीरदार , सोनामाता प्रशालेचे मुख्याध्यापक विनोद शिंदे संस्थेच्या संचालिका सुवर्णा अत्रे, युनिक फिचर्सचे सचिन घोडेस्वार, प्रिसिजन चे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.