सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या; एन.डी.स्टुडिओमध्ये घेतला गळफास

0
24

मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.’1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.

नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट
नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आता पोलीस पुढील तपास करत आहेत. नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
एनडी स्टुडीओ हे नितीन देसाई यांचं दुसरं घरच होतं. आत्महत्येच्या दोन दिवसांपासून ते स्टुडीओमध्येच होते. कालपर्यंत आपल्या टीमला त्यांनी येणाऱ्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. पण आज सकाळपासूनच त्यांनी कोणाचाही कॉल उचलला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एनडी स्टुडीओच्या अधिकाऱ्यांना याबद्दल कळवलं. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला आणि पोलिसांना याबद्दल माहिती दिली.