अनाथ मुलांच्या अंतर मनाच्या व्यथा समाजापुढे मांडण्यासाठी मराठी चित्रपट “खळगं” २२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित

0
20

सोलापूरचे दोन कलाकार “खळगं” चित्रपटात ; पत्रकारांशी साधला संवाद

सोलापूर (प्रतिनिधी) : डोईवर छत्र असणाऱ्यांच्या शौर्य कथा नेहमीच ऐकायला मिळतात, मात्र जन्मापासून डोईवरचं छत्र न लाभलेल्या अनाथ मुलांच्या अंतर मनाच्या व्यथा समाजात नेहमीच दुर्लक्षित राहतात.अनाथ मुलांच्या व्यथा प्रभावीपणे समाजापुढे मांडण्यासाठी ‘खळगं’ हा मराठी चित्रपट मराठी सिने रसिकांसमोर येतोय.अनाथांच्या वाट्याला आलेले पोरकं जगणं, समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी, त्यांचा जगण्याचा संघर्ष, या संघर्षमय वाटेवरील छोट्या-छोट्या वाटसरूच्या मोठ्या व्यथांचा वेध घेण्यात आला असून ‘खळगं’ हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील १५० चित्रपटगृहात एकाच वेळी प्रदर्शित होत असून,सोलापुरचे कलाकार सुलतान शिकलगर व भैरव जाधव या दोघांनी उत्तम अभिनय केला असल्याची माहिती चित्रपटाचे सहनिर्माते गोवर्धन दोलताडे यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

गाव-खेड्यातील व सत्यघटनेवर आधारित एका नव्या कोऱ्या चित्रपटाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. थरारक, रहस्यमय विषयावर भाष्य करणारा तसेच समाजातील वास्तववादी बाजू सिने रसिका पुढे मांडणारा ‘खळगं’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येण्यास आम्ही सज्ज आहोत,असे सहनिर्माते गोवर्धन दोलताडे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रारंभी म्हटले.

या पत्रकार परिषदेस लेखक सहनिर्माते गोवर्धन दोलताडे,दिग्दर्शक शिवाजी दोलताडे,निर्माते रोहन पाटील,प्रमुख अभिनेता कार्तिक दोलताडे,अभिनेता सुलतान शिकलगर,प्रमुख अभिनेत्री रोशनी कदम, सह अभिनेता भैरव जाधव,सह अभिनेत्री सोनाली घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.’कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘खळगं’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी पेलवली आहे. चित्रपटाच्या निर्मितीची धुरा ‘कार्तिक फिल्म्स एंटरटेनमेंटचे सह निर्माते गोवर्धन दोलताडे, सुरेश तांदळे, रोहन पाटील यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून लिला डेव्हलपमेंट,अनुराधा किसनराव नजनपाटील यांनी बाजू सांभाळली आहे.

चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद शिवाजी दोलताडे,गोवर्धन दोलताडे यांची असून चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सचिन अवघडे यांनी उत्तमरित्या साकारली आहे.पिंपरी चिंचवड, लोणीकंद आणि शिरूर परिसरातल्या गाव-खेड्यात चित्रित झालेल्या आणि वास्तविकतेचं दर्शन घडवणाऱ्या या आशयघन ‘खळगं’ चित्रपटात नवोदित कलाकारांनी चित्रीत होत असताना प्रत्येक कलाकाराने गाव-गाड्याशी एकरूप होण्यासाठी आपापल्या परीने मोठी मेहनत घेतली आहे.