भारताचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांना सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

0
42

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे ‘विद्यय्या संपन्नता’ हे ब्रीद वाक्य अतिशय सुंदर असून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी चांगली विद्या संपादन करीत संपन्नता प्राप्त करणे, हीच खरी भूषणास्पद गोष्ट असल्याचे स्पष्ट मत भारताचे माजी सरन्यायाधीश श्री उदय लळीत यांनी व्यक्त केले.

मंगळवारी, हुतात्मा स्मृती मंदिर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एकोणविसाव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश श्री उदय उमेश ललित यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मान स्वीकारल्यानंतर श्री लळीत हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत हे होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, सौ. अमिता लळीत, सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री लळीत म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्याचा प्रसंग हा खूप भावनिक आहे. माझ्या आई-वडिलांचे जन्म सोलापुरात झाले. त्यांचे शिक्षण इथे झाले. आई-वडिलांची सोलापूरच्या मातीशी नाळ आहे. माझाही जन्म येथेच झाला. पुढे वडिलांच्या नोकरीनिमित्त मुंबईला गेलो. सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत सोलापूरला आल्यानंतर वडिलांनी हरिभाई देवकरण प्रशाला व परिसर दाखविले. येथे शाळा शिकतो का विचारल्यानंतर पटकन होकारार्थी उत्तर दिले. आठवी व नववीचे शिक्षण हरिभाई देवकरणमध्ये झाल्यानंतर माझी जन्मभूमी बरोबरच कर्मभूमी ही सोलापूर राहिली. सायकलवर फिरतानाच्या येथील खूप आठवणी आहेत,  रूपाभवानी माता मंदिर,  होटगी नाका, काळजापूर मारुती, सिद्धेश्वर मंदिर आदी ठिकाणी जाणे असायचे. येथील दोन वर्षाच्या कालावधीत आजोबांनी अतिशय उच्च संस्कार केले. येथे अनेक मित्र भेटले, त्यांच्याशी आजही चांगले संबंध आहेत. सोलापूर विद्यापीठाने हा पुरस्कार प्रस्ताव दिल्यानंतर ना म्हणणे शक्य नव्हते. ध्येय ठेऊन सर्वोच्च शिखरावर गेल्याचे मला कळाले नाही. मागे वळून पाहताना आपण एवढे पुढे गेल्याचे लक्षात आले. त्यावेळी आपल्या माणसांनी कौतुक करणे, मानाचा पुरस्कार देणे यापेक्षा आनंद दुसरा कोणता नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असलेल्या सोलापूर विद्यापीठाने मायेचा हात पाठीवर ठेवले, हे माझे परम भाग्य समजतो, असे गौरवोद्गार श्री उदय लळीत यांनी  यावेळी काढले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कुलकर्णी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अल्पावधीतच चांगली प्रगती साधल्याचे कौतुक करीत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल प्रशंसा व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रात प्रगतीचा आलेख पाहताना गुणवत्ता, उत्कृष्टता, पारदर्शी, नि:पक्षपातीपणा अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर सामाजिक घटकांना सोबत घेऊन जाणे व समृद्धतेचे शिक्षण देणे, हे विद्यापीठाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आव्हाने येतात, त्यांना चांगल्या प्रकारे तोंड देऊन विद्यापीठाचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक असल्याचे मतही डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रभारी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे केवळ एका जिल्ह्यासाठी झालेले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करत एक रोल मॉडेल विद्यापीठ ठरत आहे. आज या विद्यापीठास 19 वर्षे पूर्ण झाली. विसाव्या वर्षात विद्यापीठ पदार्पण करीत असताना विविध जबाबदारी विद्यापीठांसमोर आहेत. विद्यापीठाची नूतन इमारत पूर्णत्वास येत आहे. खेलो इंडिया अंतर्गत मल्टीपर्पज हॉल निर्माण होत आहे. पारदर्शी व लोकाभिमुख प्रशासन चालवून विद्यार्थी हित जपण्यासाठी विद्यापीठाने सामाजिक करार असो अथवा विविध योजना असो त्या करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असल्याचे डॉ. कामत यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी विद्यापीठाचा आढावा प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी सादर केला. प्रास्ताविक व स्वागत कुलसचिव योगिनी घारे यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे आणि प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ. केदारनाथ कळवणे यांनी मानले. वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी सकाळी आठ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यांचा ही पुरस्काराने झाला सन्मान
1) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार:
एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर
2) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : 
प्राचार्य डॉ. शंकर नवले, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर
प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ, श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर
3)  उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ):
डॉ. रवींद्र चिंचोलकर, सामाजिकशास्त्रे संकुल
डॉ. राजीवकुमार मेंते, संगणकशास्त्र संकुल
4) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय):
प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर
प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर
5)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार:
डॉ. अभिजीत जगताप, वैद्यकीय अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
डॉ. उमराव मेटकरी, उपकुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.
6) विद्यार्थी शिष्यवृत्ती:
श्वेता मेंदर्गीकर, चिन्मय सोपल आणि शर्वरी शास्त्री