सोलापूर : खून, दरोडा, घरफोडीतील आरोपीला पोलिसांनी वेशांतर करून केली अटक

0
20

सोलापूर : खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी अशा विविध १२ गुन्ह्यांतील संशयित आरोपी आल्या ऊर्फ आण्या सुरेश काळे (रा. दत्तनगर, मोहोळ) यास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेडशीट विक्रेता बनून जेरबंद केले. त्याच्याकडून पोलिसांनी ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बरूर येथे २१ एप्रिलच्या मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी करून साडेआठ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. साहेबलाल हुसेनी शेख यांनी मंद्रूप पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी तातडीच्या तपासाचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथक नेमले.

या पथकाने मोहोळ एसटी स्टॅन्ड परिसरातून संशयित आरोपी आल्या काळेला पकडले. औराद, कंदलगाव, गुंजेगाव, भंडारकवठे, टाकळी, आटपाडी, सांगली येथे घरफोडी, चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्याला मंद्रूप पोलिसांच्या ताब्यात देऊन बरूर घरफोडीचा तपास सुरु आहे.