प्रिसिजनचे संस्थापक स्व.सुभाष रावजी शहा यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर

0
31

78 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

सोलापूर – प्रिसिजन कॅमशाफ्टस्’चे चेअरमन तथा सोलापुरातील ज्येष्ठ उद्योगपती सुभाष रावजी शहा यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त १ ऑगस्ट २०२३ रोजी प्रिसिजन कपंनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी कपंनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक यतिन शहा डॉ.सुहासिनी शहा, संचालक रवींद्र जोशी, कार्यकारी संचालक करण शहा, सीईओ अनितपाल सिंह व राजकुमार काशीद (एचआर जनरल मॅनेजर) यांच्या उपस्थितीत ठीक १२ वाजता संपूर्ण उत्पादन प्रक्रिया बंद करून १ मिनिट स्तब्ध राहून संस्थापक चेअरमन यांना अभिवादन केले. फौंड्री व मशीन शॉप मधील कर्मचाऱ्यांनी आपाआपल्या कामाच्या ठिकाणी उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. अक्कलकोट रोड MIDC मधील युनिटमध्ये देखील स्वर्गीय सुभाष रावजी शहा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर डॉ.हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 78 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.


स्व.सुभाष रावजी शहा हे प्रिसिजनचे व्यवस्थापकीय संचालक यतिन शहा यांचे वडिल होत. सुभाष रावजी शहा हे सोलापूरच्या औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात रमलेले व्यक्तीमत्व होते. १९६५ साली सुभाष शहा यांनी होटगी रोडवरील चेतन फौंड्री या नावाने सोलापुरातील पहिली फौंड्री सुरू केली. प्रिसिजनचे ते संस्थापक चेअरमन होते,अक्कलकोट औद्योगिक वसाहतीतील प्रिसिजनचे दोन्ही युनिट सुभाष शहा यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झाले. प्रिसिजनच्या उभारणीमध्ये आणि नंतरच्या वाटचालीत यतिन शहांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आणि मानसिक पाठबळ सुभाष शहा यांच्याकडूनच मिळाले. सोलापुरातील अनेक सामाजिक संस्थांशी ते संबंधित होते. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (शिवस्मारक) चे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.