प्रिसिजन वाचन अभियानाच्या कार्यक्रमात सिने पत्रकार अरुण पुराणिक यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास उलगडत अनेक रोचक किस्से आणि आठवणींनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
तंबू थिएटरपासून ते आधुनिक मल्टिप्लेक्सपर्यंत सिनेमा कसा विकसित झाला, याचा मागोवा घेताना त्यांनी आद्य सुपरस्टार मास्टर विठ्ठल यांचे मानधन, संग्राम चित्रपटावरील बंदी, किस्मत चित्रपटातील देशभक्तीचे गाणे, तसेच मीनाक्षी शिरोडकर यांचा बोल्ड सीन यांसारखे प्रसंग सांगत प्रेक्षकांसमोर जुना काळ उभा केला.
१९४३ मध्ये प्रदर्शित झालेल्या किस्मत चित्रपटातील “दूर हटो ऐ दुनिया वालों, हिंदुस्थान हमारा है” या गीताने ब्रिटिश सत्तेला हादरवले होते, तर मदर इंडियाच्या चित्रीकरणावेळी सुनील दत्त यांनी नर्गिसला दिलेले जीवदान या हृदयस्पर्शी प्रसंगाची त्यांनी आठवण सांगितली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुराणिक यांनी स्वतः संग्रहित केलेले दुर्मिळ पोस्टर्स, छायाचित्रे, ध्वनिफिती अशा जुन्या संग्रहावरील चित्रफीत दाखवण्यात आली.
प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी अरुण पुराणिक तसेच मुलाखतकार शिरीष देखणे आणि मनोज कुलकर्णी यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रिसिजनच्या सहाय्यक जनसंपर्क अधिकारी वैशाली बनसोडे यांनी केलं. यावेळी सोलापुरातील सिनेमाप्रेमी आणि वाचकप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

