अश्विनी रुग्णालयाचा अभिनव उपक्रम! नूतन न्यूरो रिहॅबिलिटेशन केंद्राचा शुभारंभ

0
82

आरोग्य सेवेत अग्रस्थानी असलेल्या अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूरने नविन न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरची उभारणी केली असून, जागतिक किर्तीचे मेंदूरोग तज्ञ डॉ. निर्मल सूर्या, मुंबई यांच्या हस्ते रविवार दि. 30 जुलै 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता या केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
डॉ. सूर्या यांना जागतिक आरोग्य संघटनेने प्रस्थापित केलेल्या World Federation of Neuro Rehabilitation मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणेसाठी नुकतेच सन्मानाने निमंत्रित केले होते. डॉ. सूर्या हे Indian Federation of Neuro Rehabilitation चे विद्यमान अध्यक्ष असून, मेंदूरोगत्रस्त रुग्णांच्या पुर्नवसन कार्यामध्ये अग्रेसर असून अशा केंद्राच्या उभारणीसाठी त्यांनी अथक परिश्रम केले आहेत. यानिमित्त डॉ. सूर्या यांचे आगमन सोलापूरसाठी अभिमानास्पद आहे.
न्यूरो रिहॅबिलिटेशन (पुनर्वसन) केंद्रासंबंधी —

ग्लास उचलणे, तोंडाला लावणे, पाणी घोटणे, घास तोडणे, चावणे, गिळणे, उठणे, उभारणे, चालणे, पळणे, बसणे, पहुडणे, झोपणे, घोरणे, अशी सोपी कामं असोत किंवा चांद्रयान पृथ्वीच्या एकट्या लाडक्या उपग्रहावर पाठवण्याचं अवघड काम असो, निसर्ग निर्मित अद्वितीय कलाकृती म्हणजे मानव शरीरातील एक संस्था कळत, नकळत अखंड काम करते. ती संस्था म्हणजे मज्जासंस्था – नर्व्हस सिस्टीम. मोठा मेंदू, छोटा मेंदू, मज्जारज्जू, मज्जातंतू यांच्या आज्ञेप्रमाणे काम करणारे स्नायू, ग्रंथी, अंत:स्त्राव ग्रंथी हे सर्व भाग पूर्णत: किंवा अंशत: या संस्थेत समाविष्ट आहेत. कुठल्याही घटकाला कोणत्याही विकाराने घेरलं तर खूप अडचणी येतात. रोजीरोटी जाऊ शकते, माणसाने माणसाशी माणसासम वागणं बिघडते, दैनंदिन सहज पार पडणारी कर्मे अवघड होतात. हे सर्व पुन्हा सुरळीत व्हावे म्हणून जुनी नवीन औषधे, मात्रा आहेत, त्यांचा वापर आहेच – पण नर्व्हस सिस्टीम रुग्णांना 100 पैकी किमान 80 टक्के पूर्वपदावर आणण्यासाठी विशिष्ट व्यायाम, त्याकरिता कौशल्य वापरुन बनवलेली साधने, मशिनरी, समुपदेशन यांची नितांत गरज असते. हे सर्व न्यूरो रिहॅबिलिटेशन – मज्जासंस्थाविकार पुनर्वसन केंद्रात उपलब्ध केलेले असते, असे सेंटर परदेशात खूप आहेत. सोलापूर अश्विनीला येणाऱ्या स्थानिक व शे-दीडशे मैलाच्या परिसरातील रुग्णांना अशा केंद्राची गरज आहे.
ही प्रक्रिया म्हणजे न्यूरो रिहॅबिलिटेशन हे कोणा एका व्यक्तीचे काम नसून टीमवर्क आहे. ह्यामध्ये Neurologist, Neuro Surgeon, Physician, Orthopedician, Physiotherapist, Speech therapist, Occupational Therapist, Psychiatrist ह्या सर्वांचे योगदान असते. हे सर्व तज्ञ डॉक्टर ज्याठिकाणी रुग्णांचे पुर्नवसन करतील ते न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर होय. अशा न्यूरो रिहॅबिलिटेशनची सेवा अश्विनी सहकारी रुग्णालयात सुरु करावी ही आमच्या मा.चेअरमन श्री.बिपीनभाई पटेल यांची संकल्पना आहे. अशा प्रकारचे एक समर्पित न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर सोलापूरात आता साकार होत आहे.
न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे ज्या रुग्णांना Hemiplegia, Paraplegia, Parkinson’s disease अशा प्रकारच्या आजारामुळे हातापायात कंप / कमकुवतपणा आहे, अशा रुग्णांना भौतिकोपचारच्या माध्यमातून उपचार केला जातो. अशा रुग्णांचे पुनर्वसन करुन त्यांना जास्तीतजास्त स्वावलंबी करुन आपण मदत करु शकतो.
ह्या सेंटरमध्ये नवीन अत्याधुनिक उपकरणे वापरण्यात येणार आहेत.
उदा :- गेट ट्रेनर, रोबोटिक हैंड असिस्ट, टिल्ट टेबल
ह्या उपकरणाने रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते.
अशा प्रकारची इतर विविध उपकरणे उपलब्ध आहेत.

या निमित्ताने वरील रुग्णांसाठी मोफत शिबिर दि. 30 जुलै 2023 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 पर्यंत आयोजित केले आहे. शिबिरात सहभागी रुग्णांना 50 टक्के सवलतीच्या दरात भौतिकोपचार दिला जाईल.
नाव नोंदणीसाठी संपर्क :- अश्विनी सहकारी रुग्णालय न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर
दि.28/07/2023 पूर्वी नाव नोंदणी आवश्यक फोन नं.0217 – 2319900 – 06 Ext. 404

या विशेष संधीचा फायदा जास्तीतजास्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन चेअमरन श्री.बिपीनभाई पटेल यांनी केले आहे. या उपक्रमासाठी मेंदूरोगतज्ञ डॉ.प्रीतेश अग्रवाल, डॉ.शंतनू गुंजोटीकर, न्यूरो फिजिओथेरपीस्ट डॉ.सौ. मनीषा तळपल्लीकर, डॉ.सौ.राधिका क्षीरसागर, डॉ. संकेत हरहरे, डॉ. जेसिका ऍ़न्थोनी हे कार्यरत आहेत.
मा.श्री. बिपीनभाईंच्या मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाच्या सक्रिय सहभागाने इतर तज्ञ डॉक्टरांच्या, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा विभाग कार्यान्वित होत असून सोलापूरच्या आरोग्यसेवेमधील हे नाविन्यपूर्ण पाऊल गरजवंत रुग्णांना अतिशय उपयुक्त वरदान ठरणार आहे असे श्री. बिपीनभाईंनी नमूद केले. या पत्रकार परिषदेत संचालक डॉ.विजय पाटील, अशोक लांबतूरे,वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र घुली, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ.प्रशांत औरंगाबादकर, प्रशासकीय अधिकारी श्री.सचिन बिज्जरगी, मेंदूरोगतज्ञ डॉ.प्रीतेश अग्रवाल, डॉ.शंतनू गुंजोटीकर, न्यूरो फिजिओथेरपीस्ट डॉ.सौ. मनीषा तळपल्लीकर, डॉ.सौ.राधिका क्षीरसागर, डॉ. संकेत हरहरे, उपस्थित होते.