उजनीत ६५ टक्के पाणीसाठा; डिसेंबर मध्ये आवर्तनाची शक्यता, कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाकडे लक्ष
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना रब्बी हंगामासाठी उजनी धरणातून शेतीला पाणी मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला शेतीसाठी एक आवर्तन सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
४ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात ३५.३० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून धरणाची पातळी सुमारे ६५ टक्के आहे. गतवर्षी याच काळात धरण पूर्ण क्षमतेने भरलेले होते. यंदा पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने पाणी नियोजनाचे आव्हान वाढले आहे.
शेतीचे आवर्तन की पिण्याच्या पाण्याला प्राधान्य?
जिल्ह्यातील अनेक भागांत रब्बी पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय प्रशासनासाठी कसोटीचा ठरणार आहे. नोव्हेंबर ते मे या कालावधीत बाष्पीभवनामुळे सुमारे नऊ टीएमसी पाणी कमी होण्याचा अंदाज आहे.
कर्नाटकाच्या मागणीमुळे चिंता वाढली
कर्नाटक सरकारने उजनीतून सात टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज आणि आगामी उन्हाळ्याचे आव्हान लक्षात घेता उपलब्ध साठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.











