सोलापूर शहरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपांना टाळे लागल्याने रिक्षाचालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पुढील २० दिवस गॅस मिळण्याची शक्यता नसल्याने जवळपास १८ हजार रिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सोलापुरात आरटीओ नोंदणीकृत १८ हजार रिक्षांना दररोज २२ टन गॅसची आवश्यकता असते. पेट्रोलच्या तुलनेत गॅस स्वस्त आणि अधिक मायलेज देणारा असल्याने चालकांचा ओढा एलपीजीकडे होता. मात्र, आता ५० रुपयांचा गॅस १०० रुपयांवर पोहोचला आहे आणि त्यातच सर्व पंपांवरील पुरवठा बंद झाला आहे. “घर कसे चालवायचे आणि भाडे कसे परवडणार?” असा प्रश्न रिक्षाचालक विचारत आहेत. सरकारने तातडीने रिक्षाचालकांसाठी गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी आर्त विनंती त्यांनी केली आहे.











