येस न्युज मराठी नेटवर्क । एल्गार परिषद २०२१ घेण्यासाठी पुणे पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. त्यानुसार पुणे येथील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे आज (30 जानेवारी 2021) ही परिषद पार पडत आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी ही परिषद आयोजित केली आहे. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी स्वारगेट पोलिसांकडे ही परिषद घेण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतू, तीन वर्षांपूर्वी एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव येथे घडलेली घटना आणि यंदाच्या वर्षी राज्यावर असलेले कोरोना व्हायरस संकट या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
स्वारगेट पोलिसांनी एल्गार परिषद घेण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांनी जर एल्गार परिषदेला परवानगी नाकारली तर आपण रस्त्यावर येऊन जेलभरो आंदोलन करु, असा इशारा कोळसे पाटील यांनी दिला होता. कोळसे पाटील यांनी इशारा देऊनही काही काळ पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परंतू, अखेर पोलिसांनी एल्गार परिषदेसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ही परिषद घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.