डॉ.शिवाजी शिंदे यांच्या ‘अंतःस्थ हुंकार’ या काव्यसंग्रहाचा रविवारी प्रकाशन सोहळा

0
18

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे शाखा सोलापूर व हर्मिस प्रकाशन,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी अँफी थिएटर,हिराचंद नेमचंद वाचनालय,सोलापूर येथे सायंकाळी ५ : ३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,सोलापूर विद्यापीठात सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत असणारे डॉ.शिवाजी शिंदे यांच्या ‘ अंतःस्थ हुंकार ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस ह्या असणार आहेत.८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

डॉ. रणधीर शिंदे,मराठी विभाग प्रमुख,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर,हे या कवितासंग्रहातील कवितेवर भाष्य करणार आहेत.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, शाखा सोलापूरच्या अध्यक्षा डॉ.श्रुती वडगबाळकर,मसाप सोलापूर शाखेचे कार्याध्यक्ष श्री.किशोर चंडक,हर्मिस प्रकाशन,पुणे चे प्रकाशक श्री.सुशील धसकटे यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

डॉ. शिवाजी शिंदे , यांचा हा दुसरा काव्यसंग्रह असून त्यांच्या कैवार या पहिल्या कवितासंग्रहाला सगळ्या महाराष्ट्रातून तीस पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.त्यामध्ये लोकमंगल पुरस्कार,ग.द.माडगूळकर पुरस्कार,मंगेश पाडगावकर पुरस्कार,कादवा पुरस्कार,स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार,आपले वाचनालयाचा राशीनकर पुरस्कार इत्यादी.
या प्रकाशन सोहळ्यासाठी सोलापुरातील साहित्य रसिकांनी अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे शाखा सोलापूर व हर्मिस प्रकाशन,पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.